Top News

सातारा जिल्हा पोलीस दलातील वाहतूक पोलिसाची पोलादपूरमध्ये आत्महत्या कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून कारणा चा उलगडा.


सातारा जिल्हा पोलीस दलातील वाहतूक पोलिसाची पोलादपूरमध्ये आत्महत्या
कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमधून कारणाचा उलगडा

सातारा/पोलादपूर : सातारा जिल्हा पोलीस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या संतोष रामचंद्र ननावरे (वय ३६, रा. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, ननावरे हे काही काळापासून कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने ते नैराश्यात होते, अशी माहिती त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनेची नोंद करून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
संतोष ननावरे हे सातारा जिल्हा पोलीस दलात वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर सातारा पोलीस दलासह त्यांच्या मूळ गावात आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमागे नेमकी कोणती कौटुंबिक परिस्थिती होती, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या बाबींचीही पडताळणी केली जात आहे. आत्महत्येपूर्वी त्यांच्या संपर्कात कोण होते, ते पोलादपूर येथे नेमके कशासाठी आले होते आणि घटनेपूर्वी त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला होता, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post