मिरज सिव्हिलच्या प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळला; सात मजूर जखमी
मिरज | प्रतिनिधी
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या नव्या प्रवेशकमानीच्या बांधकामादरम्यान स्लॅब अचानक कोसळून सात कामगार जखमी झाल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
सुमारे २५ फूट उंच आणि ३० फूट लांब कमानीवर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असताना आधारव्यवस्था अचानक कोसळली. त्याखाली काम करणारे सात मजूर काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर सर्व सात मजुरांना बाहेर काढण्यात आले.
जखमी मजुरांना तातडीने मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती असून, नंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या आधारव्यवस्थेच्या मजबुतीबाबत तसेच कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांकडून घटनेची चौकशी करण्यात येत असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाची शक्यता तपासली जात आहे.
Post a Comment