Top News

अशोक खरातची पाद्यपूजा करण्याची इच्छा नव्हती; लोकांच्या आग्रहामुळे पूजा केली! रुपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण


अशोक खरातची पाद्यपूजा करण्याची इच्छा नव्हती; लोकांच्या आग्रहामुळे पूजा केली! रुपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण

मुंबई : अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात निर्माण झालेला वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अशोक खरात याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मला अशोक खरातची पाद्यपूजा करायची नव्हती; मात्र उपस्थित लोकांच्या आग्रहामुळे पूजा केली,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.

https://www.facebook.com/share/v/1DRtfEtkDs/

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्या कुटुंबासह उपस्थित होत्या. त्यावेळी अनेक मान्यवरांनी आणि महिलांनी अशोक खरात याची पाद्यपूजा व औक्षण केले होते. आपण कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यामुळे मागे बसलो होतो. त्यानंतर उपस्थितांनी आग्रह केल्याने पाद्यपूजा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद

अशोक खरात याला मार्च २०२६ मध्ये अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा पाद्यपूजा करतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला.

आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळले

अशोक खरात याच्यासोबत कोणताही आर्थिक किंवा जमिनीचा व्यवहार केलेला नाही. तसेच कोणत्याही महिलेला आपण त्याच्याकडे घेऊन गेलेलो नाही, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात आपली भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचीही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

इतर मान्यवरांच्या उपस्थितीवरही प्रश्न

संबंधित कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनीही पाद्यपूजा केली होती. मग केवळ आपल्याच व्हिडीओवरून प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, असा सवालही चाकणकर यांनी उपस्थित केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांकडून आणि राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जन प्रतिसाद एक्सप्रेस | महाराष्ट्रातील घडामोडींचा वेध

Post a Comment

Previous Post Next Post