Top News

मिरजेत भरदिवसा रक्तरंजित थरार! कोयत्याने वार करून ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; शहरात खळबळ


मिरजेत भरदिवसा रक्तरंजित थरार! कोयत्याने वार करून ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

घरासमोर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून वाद; पोलिसांची तीन पथके संशयितांच्या शोधात

मिरज | जन प्रतिसाद एक्सप्रेस

मिरज शहरात भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. डोणगे गल्ली परिसरात घरासमोर पाणी मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ईलाइ लालसाब शेख असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरासमोर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हल्ल्यात झाले. यावेळी शेख यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत.

भरदिवसा शहरातील वस्तीमध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हत्येत झाल्याने मिरज शहरात संताप व्यक्त होत आहे.

किरकोळ वादातून थेट हत्या होत असल्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील संशयितांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post