सांगलीच्या राजकारणात नवा ट्विस्ट! गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकाच मंचावर; शिवरायांच्या इतिहासावरून रंगली जोरदार शाब्दिक चकमक!
बावचीतील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय टोलेबाजी; पडळकरांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा खोचक पलटवार!
https://www.facebook.com/share/v/19bauv1mEj/
सांगली | प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या एकाच व्यासपीठावरील उपस्थितीची जोरदार चर्चा सुरू आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते वाळवा तालुक्यातील बावची येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने समोरासमोर आले. मात्र, हा कार्यक्रम केवळ लोकार्पण सोहळ्यापुरता मर्यादित राहिला नाही. दोन्ही नेत्यांमधील भाषणबाजी, समर्थकांची घोषणाबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून झालेली टोलेबाजी यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग चढला.
पडळकरांचे आगमन अन् समर्थकांची जोरदार घोषणाबाजी!
बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, विधान परिषदेच्या आमदार हर्षदा देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी जयंत पाटील उपस्थित असतानाच गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे आगमन झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही काळ वातावरण तापले.
मात्र, जयंत पाटील यांनी स्वतः माईक हातात घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपल्या मतदारसंघात आलेल्या पाहुण्यांचा सन्मान राखला पाहिजे, आपण सुसंस्कृतपणे वागले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर पडळकर यांचा व्यासपीठावर सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
पडळकरांचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला!
आपल्या भाषणात गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा दाखला देत राजकीय विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचे नसते, त्याच्या कोंडीतून मार्ग काढायचा असतो, असा आशय व्यक्त करत त्यांनी शिवरायांच्या युद्धनीतीचा उल्लेख केला. तसेच 'घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो' अशा शब्दांत त्यांनी राजकीय टोला लगावला.
यावेळी शनिवारवाड्यात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याच्या ऐतिहासिक प्रसंगाचाही संदर्भ त्यांनी दिला. मात्र, अफजलखानाच्या वधाचा उल्लेख करताना त्यांनी पन्हाळगडाचा संदर्भ दिल्याने पुढे हाच मुद्दा चर्चेचा विषय ठरला.
जयंत पाटलांचा भर मंचावरून जोरदार पलटवार!
पडळकरांच्या वक्तव्याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी संयम आणि संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला.
'आपण कधी चिडायचं नसतं, आपली संस्कृती सोडायची नसते आणि आपल्याकडे आलेल्या माणसाला सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची,' अशा आशयाचे वक्तव्य करत त्यांनी पडळकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
त्यानंतर त्यांनी थेट इतिहासातील संदर्भावर बोट ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध पन्हाळगडाच्या पायथ्याशी नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता, असे स्पष्ट करत पडळकरांच्या विधानातील चूक निदर्शनास आणून दिली.
'पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या. पाठ केलेलं भाषण असलं की असं होतं,' अशा खोचक शब्दांत जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर दोन्ही नेत्यांची भेट चर्चेत!
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. या निवडणुकीत पडळकर यांनी विजय मिळवल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या राजकीय संघर्षाला नवी धार मिळाल्याची चर्चा होती.
अशा परिस्थितीत जयंत पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील वाळवा तालुक्यातील बावची येथे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राजकीय संघर्ष की वैचारिक टोलेबाजी?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासारख्या ऐतिहासिक आणि गौरवशाली कार्यक्रमात दोन प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये झालेली ही शाब्दिक चकमक आता चर्चेचा विषय बनली आहे. एका बाजूला पडळकरांची आक्रमक भाषाशैली, तर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांचा अभ्यासपूर्ण प्रत्युत्तराचा दावा, यामुळे या कार्यक्रमाची चर्चा जिल्ह्याबाहेरही पोहोचली आहे.
दोन्ही नेत्यांची राजकीय लढाई आगामी काळात कोणते वळण घेणार? जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर या भेटीचे काही नवे राजकीय परिणाम दिसणार का? याकडे आता सांगली जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
जन प्रतिसाद एक्सप्रेसचा सवाल : राजकारणात आरोप-प्रत्यारोप महत्त्वाचे की इतिहासाचा अचूक अभ्यास? तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा!
Post a Comment