Top News

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद राहणार?१५ किंवा १६ ऑक्टोबरपासून मंदिर बंद ठेवण्याचा विचार; अंतिम निर्णयाकडे भाविकांचे लक्ष

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील विविध विकासकामे, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर काही काळ दर्शनासाठी बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ किंवा १६ ऑक्टोबर २०२६पासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. हा कालावधी सुमारे दोन महिन्यांचा असण्याची शक्यता आहे. मात्र, मंदिर नेमक्या कोणत्या तारखेपासून आणि किती दिवस बंद राहणार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात देशभरातून मोठ्या संख्येने साधू-महंत तसेच भाविक दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी मंदिर परिसरातील आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुशावर्त तीर्थही दुरुस्ती व संवर्धनाच्या कामासाठी ३० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. कुंडातील पाणी काढून स्वच्छता, दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.
भाविकांमध्ये उत्सुकता
त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहण्याची शक्यता समोर आल्यानंतर देशभरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः ऑक्टोबरपासून त्र्यंबकेश्वर दर्शनाचे नियोजन करणाऱ्या भाविकांनी मंदिर संस्थानकडून अधिकृत सूचना जाहीर होईपर्यंत प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मंदिराची कामे पूर्ण करून भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख, बंदचा कालावधी आणि दर्शनाची व्यवस्था याबाबत देवस्थान ट्रस्टकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post