Top News

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या बैठकीनंतर गोकुळ निवडणुकीत महायुतीचा तिढा सुटला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या बैठकीनंतर गोकुळ निवडणुकीत महायुतीचा तिढा सुटला.

फक्त नऊ जागा मिळाल्याने राष्ट्रवादीची नाराजीचा सुर

 १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ऑक्टोबरला निकाल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र बनलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता चांगलाच रंग चढला आहे.


 महायुतीतील जागावाटपाचा प्रदीर्घ तिढा अखेर सुटला असला तरी जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महायुतीमधील अंतर्गत समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे  अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नसून नऊ जागांवर समाधान मानावे लागल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीचा सूर उमटला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून दहा जागांची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

याशिवाय आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनाही राष्ट्रवादीच्या वाट्यातून जागा देण्यात आल्याने पक्षातील जागांचे गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

जागावाटपाचे गणित कसे बदलले?

गोकुळच्या २५ संचालक पदांसाठी महायुतीमध्ये जागावाटपावर अनेक दिवस चर्चा सुरू होती. सुरुवातीला राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, भाजपला ६ आणि जनसुराज्यला २ जागांचे सूत्र चर्चेत होते. त्यानंतर भाजपकडून आणखी एका जागेची मागणी करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या वाट्यातील एक जागा कमी करून भाजपला देण्यात आल्याची चर्चा आहे.


यामुळे ठरावांची संख्या आणि मिळालेल्या जागांचे प्रमाण यावरून महायुतीतील अंतर्गत चर्चा पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

स्थानिक पातळीवर जागावाटपाचा प्रश्न सुटत नसल्याने अखेर हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर गेला. मुंबईतील बैठकीत महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर जागावाटपाचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे.

महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्ष उमेदवार निश्चिती आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेत कोणते राजकीय बदल होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

८ ऑक्टोबरला पॅनेल जाहीर होण्याची शक्यता

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचे पॅनेल ८ ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध विरोधक असा थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची नावे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्ष चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

१८ ऑक्टोबरला मतदान; १९ ऑक्टोबरला निकाल

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकूण २५ संचालक पदांसाठी मतदान होणार आहे. अंतिम मतदार यादीमध्ये ५,३३१ मतदार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे गोकुळचा पुढील कारभार कोणाच्या हातात जाणार, याबरोबरच या निवडणुकीचा आगामी कोल्हापूर जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जन प्रतिसाद एक्सप्रेस विशेष

गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक राहिलेली नसून कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणातील शक्तिसमीकरणांची कसोटी ठरणार आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी राष्ट्रवादीतील नाराजी, उमेदवारांची अंतिम निवड आणि विरोधकांची रणनीती यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post