Top News

सावकारीविरोधात कोल्हापूर पोलिसांचा धडाका; जिल्ह्यात ५२ सावकारांवर कारवाई



सावकारीविरोधात कोल्हापूर पोलिसांचा धडाका; जिल्ह्यात ५२ सावकारांवर कारवाई

कोल्हापूर परिक्षेत्रात ३२३ सावकारांवर कारवाई; आर्थिक पिळवणुकीविरोधात पोलिसांची कडक भूमिका


कोल्हापूर : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना कर्ज देऊन त्यांच्याकडून दहापट व्याजाची वसुली करणे, मालमत्ता आणि जमिनीवर दबाव निर्माण करणे तसेच दहशतीचा वापर करणे, अशा बेकायदा सावकारीविरोधात कोल्हापूर परिक्षेत्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.


जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सावकारी अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या १३४ गुन्ह्यांमध्ये तब्बल ३२३ सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ गुन्ह्यांमध्ये ५२ सावकारांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही कारवाईचा धडाका

कोल्हापूर परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्येही बेकायदा सावकारीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार सोलापूर ग्रामीण भागात ८७, पुणे ग्रामीणमध्ये ८७, सातारा जिल्ह्यात ३७ तर सांगली जिल्ह्यात २६ सावकारांवर कारवाई झाली आहे.

गरजू नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेऊन सामान्य नागरिकांची पिळवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. बेकायदा सावकारीमुळे त्रास होत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.

सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशा कारवायांना अधिक वेग मिळणार का, याकडे आता कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post