Top News

मिरज भूखंड प्रकरणावर काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; महापालिकेसमोर धरणे आंदोलन

भूखंड प्रकरणावर काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; महापालिकेसमोर धरणे आंदोलन

जन प्रतिसाद : 
मिरजेतील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाबाबत झालेल्या तडजोडीच्या ठरावावरून राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
 आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक नोटांची उधळण करून महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. संबंधित ठराव रद्द करावा आणि प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनाचे नेतृत्व महापालिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक फिरोज पठाण, तसेच मयूर पाटील, ॲड. बिलकीस बुजरूक, दीपाली पाटील, स्मिता यमगर, सोनल सावर्डेकर, वर्षा निंबाळकर, अश्विनी कदम, सलमा शिकलगार, सागर बिरनाळे, दिलीप पाटील, चेतन कदम, सौरभ पाटील, प्रसाद पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि किरण देवकुळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ठराव रद्द करण्याची मागणी
सुमारे साडेसात एकर महापालिकेच्या ताब्यातील जागेबाबत महासभेत तडजोडीचा ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हा ठराव कोणत्या कायदेशीर आधारावर करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या जागेवर ई-बस चार्जिंग स्टेशनसह सार्वजनिक प्रकल्पाचे काम सुरू असल्याने प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रकल्पासाठी महापालिकेचा निधी खर्च झाल्यानंतर संबंधित जागेबाबत तडजोडीचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस-शिवसेना नेत्यांची बैठक
आंदोलनानंतर मंगेश चव्हाण यांच्या दालनात काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला मंगेश चव्हाण, राजेश नाईक, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील, शिवसेना गटनेते युवराज बावडेकर आणि नगरसेवक सागर वनखंडे उपस्थित होते.
महापालिकेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पुढील कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post