Top News

वाळवा तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; जयंत पाटलांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र



वाळवा तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा; जयंत पाटलांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

सांगली : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
वाळवा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
अनियमित पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला असून, अनेक भागात शेतीच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक निकषांऐवजी प्रत्यक्ष पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वाळवा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केल्यानंतर वगळलेल्या तालुक्यांचा प्रत्यक्ष परिस्थितीनुसार आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. काही तालुक्यांचा आवश्यकतेनुसार ट्रिगर-३ अंतर्गत समावेश केला जाणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्याचा तातडीने सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा आणि शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
वाळवा तालुक्याचा समावेश झाल्यास दुष्काळी उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post