Top News

लालबागच्या राजाच्या चरणी चक्क १ किलो सोन्याची वीट!

लालबागच्या राजाच्या चरणी चक्क १ किलो सोन्याची वीट!

चांदीची गदा, सोन्याचे मोदक, गणेशमूर्ती अन् मौल्यवान दागिने; भक्तांच्या अर्पणाचा आज लिलाव

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणेशोत्सवात यंदाही भक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि नवसापोटी सोन्या-चांदीसह विविध मौल्यवान वस्तू अर्पण केल्या. गणेशोत्सव संपल्यानंतर या वस्तूंच्या लिलावाला सुरुवात झाली असून, यंदाच्या लिलावातील सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे तब्बल १ किलो वजनाची २४ कॅरेट सोन्याची वीट.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात भक्ताने ही सोन्याची वीट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली. तिची बाजारमूल्य किंमत सुमारे १ कोटी ४८ लाख रुपये असल्याचे वृत्त आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याची १४१ ग्रॅम वजनाची गणेशमूर्तीही भक्ताने अर्पण केली असून तिची किंमत सुमारे १५ लाख ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोन्या-चांदीच्या वस्तूंची रेलचेल

लिलावात केवळ सोन्याची वीट आणि गणेशमूर्तीच नव्हे, तर भक्तांनी अर्पण केलेले सोन्याचे मोदक, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या गदा, क्रिकेटच्या बॅट आणि अन्य मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे. त्यामुळे लिलावाकडे भक्तांसह खरेदीदारांचेही लक्ष लागले आहे.
कोट्यवधींची रोख देणगीही

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या विविध दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा झाली. उपलब्ध वृत्तानुसार, स्टेजपेटी, रांगपेटी आणि मिरवणूक पेटी मिळून ६ कोटी ११ लाख ९६ हजार ५०० रुपयांची रोख देणगी प्राप्त झाली आहे. याशिवाय सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू भक्तांनी अर्पण केल्या आहेत.

श्रद्धेचे दान, आता लिलावातून मूल्य

लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांकडून अर्पण होणाऱ्या वस्तूंमध्ये दरवर्षी विविधता पाहायला मिळते. यंदाही सोन्याच्या दागिन्यांपासून चांदीच्या वस्तू, परदेशी चलन आणि इतर मौल्यवान वस्तूंपर्यंत अनेक प्रकारचे अर्पण झाले. या वस्तूंचा लिलाव हा गणेशोत्सवानंतरचा महत्त्वाचा टप्पा ठरतो.
१ किलो सोन्याची वीट, सोन्याची गणेशमूर्ती आणि चांदीच्या गदांसारख्या वस्तूंमुळे यंदाचा लिलाव विशेष चर्चेत आला असून, या वस्तूंना किती बोली मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post