Top News

शिक्षक बँकेच्या सभेत राडा; गुरुजीच एकमेकांच्या अंगावर धावले! विषय पत्रिका, नफा-तोटा आणि डीसीपीएस सभासदांच्या प्रश्नांवरून गोंधळ; माईक हिसकावण्याचाही प्रकार

शिक्षक बँकेच्या सभेत राडा; गुरुजीच एकमेकांच्या अंगावर धावले!
विषयपत्रिका, नफा-तोटा आणि डीसीपीएस सभासदांच्या प्रश्नांवरून गोंधळ; माईक हिसकावण्याचाही प्रकार

कोल्हापूर | २८ सप्टेंबर २०२६
कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी जोरदार गोंधळ झाला. बँकेच्या कामकाजातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी गटातील सभासदांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढताच काही सभासद एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभेचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.
आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या सभेत विषयपत्रिका वाचन, नफा-तोटा पत्रक, डीसीपीएस (एनपीएसधारक) सभासदांचा मयत कल्याण निधी आदी विषयांवर चर्चा सुरू होती. यावेळी विरोधी गटातील सभासदांनी व्यासपीठाजवळ जाऊन प्रश्न उपस्थित केले. त्यातून शाब्दिक वाद वाढला आणि हातवारे करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले.
गोंधळ वाढल्यानंतर माईक हिसकावून घेण्याचाही प्रकार झाला. अखेर चेअरमन बाबूराव परीट यांनी माईक हातात घेऊन सभासदांना शांत राहण्याचे आवाहन केले. गोंधळाचे वातावरण असतानाही सभा पुढे सुरू ठेवण्यात आली.
सभेत बँकेच्या नफ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच काही शाखांमधील कर्मचारी संख्या, डीसीपीएस सभासदांशी संबंधित प्रश्न आणि सभासदांना देण्यात आलेल्या आश्वासनांवरूनही विरोधकांनी सवाल उपस्थित केले.
दरम्यान, बँकेच्या संचालकांची संख्या १७ वरून २१ करण्याच्या पोटनियम दुरुस्तीला सभासदांनी मंजुरी दिल्याचे वृत्त आहे.
शिक्षकांच्या सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत पुन्हा एकदा झालेल्या या गोंधळामुळे सभेतील कामकाज चर्चेचा विषय ठरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post