Top News

मुंबई पोलिसांच्या नागपाडा कॅन्टीनवर FDA ची कारवाई; चालकाला ७५ हजारांचा दंड!


मुंबई पोलिसांच्या नागपाडा कॅन्टीनवर FDA ची कारवाई; चालकाला ७५ हजारांचा दंड!

तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाचा दणका; वर्षभराच्या तक्रारींवर आठवडाभरात कारवाई झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची चर्चा

मुंबई : मुंबईतील नागपाडा येथील मुंबई पोलीस दलाच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. कॅन्टीनमधील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत मिळालेल्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने कॅन्टीन चालकाला तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईची सध्या मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे.




https://www.facebook.com/share/v/1JDLeoxVaG/

वर्षभर तक्रारी, तरीही प्रश्न प्रलंबित!

नागपाडा येथील मुंबई पोलीस मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तसेच स्वच्छतेच्या अभावाबाबत पोलीस कर्मचारी गेल्या वर्षभरापासून नाराजी व्यक्त करत होते. कॅन्टीनमधील परिस्थिती सुधारावी, यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मात्र, या तक्रारींवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत FDA विभागाने संबंधित कॅन्टीनची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छतेच्या त्रुटी आढळल्यानंतर कॅन्टीन चालकावर ७५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आठवडाभरात कारवाई झाल्याने चर्चेला उधाण!

विशेष म्हणजे, वर्षभरापासून प्रलंबित असल्याचे सांगितले जाणारे हे प्रकरण FDA कडे तक्रार गेल्यानंतर अवघ्या आठवडाभरात मार्गी लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे.

'जे वर्षभरात मुंबई पोलिसांना जमले नाही, ते तुकाराम मुंढे यांनी आठवडाभरात करून दाखवले,' अशी चर्चा या कारवाईनंतर सुरू झाली आहे.

भेसळखोरांविरोधातही FDA ची मोहीम सुरूच

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत भेसळयुक्त खाद्यतेल आणि अन्नपदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलासंदर्भात आतापर्यंत १ हजार ८९ तपासण्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ८० परवाने रद्द करण्यात आले असून २८ हजार ७५३ क्विंटल माल जप्त करण्यात आला आहे.

तसेच कालबाह्य, खराब किंवा परत आलेले अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी वापरले जाऊ नयेत, यासाठी संबंधित कंपन्यांना ते अन्नपदार्थ नष्ट केल्याचा पुरावा सादर करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

आता इतर कॅन्टीनचीही तपासणी होणार का?

नागपाडा येथील पोलीस कॅन्टीनवरील कारवाईमुळे सरकारी कार्यालये, पोलीस विभाग, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमधील कॅन्टीनच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

केवळ खासगी हॉटेल किंवा खाद्यविक्री केंद्रांवरच नव्हे, तर शासकीय कार्यालयांमधील कॅन्टीनमध्येही अन्नसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार असावे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

नागपाडा येथील कारवाईनंतर राज्यातील इतर सरकारी कॅन्टीनचीही नियमित तपासणी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


जन प्रतिसाद एक्सप्रेस : अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन प्रत्येक खाद्य व्यावसायिकाने करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकारांवर प्रशासनाने नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post