Top News

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; ९ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; ९ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणीच्या प्रक्रियेवरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रस्तावित महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने जमीन मोजणी, भूसंपादन, मोबदला आणि शेतीवर होणाऱ्या परिणामांबाबत शेतकरी प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदवले.
पंढरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी करण्यात आल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीत केला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या हरकतींची योग्य दखल न घेता मोजणी अथवा भूसंपादन प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची एकजूट कायम ठेवून राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाच्या नियोजनानुसार ९ ऑक्टोबर रोजी विविध जिल्ह्यांत निवेदन आणि आंदोलन करण्यात येणार असून, ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात राज्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधींची बैठक होणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जमीन मोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतीची जमीन, शेतकऱ्यांची उपजीविका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता असून, सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये यावर तोडगा कसा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post