Top News

मुंबईत मातंग समाजाचा महामोर्चा; आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आझाद मैदानावर एल्गार

मुंबईत मातंग समाजाचा महामोर्चा; आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आझाद मैदानावर एल्गार


मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी घेऊन मातंग समाजाने आज, मंगळवारी (29 सप्टेंबर) मुंबईत मोठे आंदोलन उभारले आहे.
 राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13 टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करावे, अशी मातंग समाजाची प्रमुख मागणी आहे. या निर्णयासाठी शासनाने तातडीने शासन निर्णय (GR) काढावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती बदर समितीने 16 मार्च 2026 रोजी आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. माजी आमदार रमेश कदम यांना मोर्चात सहभागी होण्यापूर्वी पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचे एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
‘उपवर्गीकरणाचा शासन निर्णय होईपर्यंत माघार नाही’ अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे राज्य सरकार तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post