Top News

कोल्हापुरात बिबट्याची दहशत! लक्षतीर्थ–फुलेवाडी परिसरात वन विभागाची शोधमोहीम सुरूच

कोल्हापुरात बिबट्याची दहशत! लक्षतीर्थ–फुलेवाडी परिसरात वन विभागाची शोधमोहीम सुरूच

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर शहरालगतच्या लक्षतीर्थ वसाहत–फुलेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री बिबट्या रस्ता ओलांडून उसाच्या शेतात गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानंतर वन विभाग, पोलीस, महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली.


बिबट्याचा माग काढण्यासाठी थर्मल ड्रोनच्या माध्यमातून ऊस शेती, नदीकाठ, निर्जन भाग तसेच लोकवस्तीच्या परिसराची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप बिबट्या प्रत्यक्ष हाती लागलेला नाही किंवा त्याच्या उपस्थितीची ठोस पुष्टी झालेली नाही.

लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, भुयेवाडी आणि वाठार परिसरातील नदीकाठ व ऊस शेतीमध्ये विविध पथकांकडून शोध सुरू आहे. बिबट्या आढळल्यास त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि ट्रँक्युलायझर गनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, बिबट्या दिसल्याच्या चर्चेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘जनप्रतिसाद’चा सवाल : शहरालगत बिबट्याचा वावर असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने रात्रीची गस्त आणि शोधमोहीम अधिक प्रभावी करण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post