Top News

गोकुळच्या सत्तासंघर्षात चार तज्ज्ञ संचालकांची एन्ट्री! अध्यक्ष निवडीसाठी गोकुळमध्ये दाखल; स्वतंत्र मतपेटीत मतदान होणार


गोकुळच्या सत्तासंघर्षात चार तज्ज्ञ संचालकांची एन्ट्री! अध्यक्ष निवडीसाठी गोकुळमध्ये दाखल; स्वतंत्र मतपेटीत मतदान होणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच आज चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालक गोकुळच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून गोकुळमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या चार संचालकांमध्ये डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, शिवाजी दिनकर आडनाईक, के. डी. पाटील आणि सांगलीचे ॲड. प्रशांत पाटोळे यांचा समावेश आहे. या चारही संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

गोकुळच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुती समर्थित आघाडीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेली गणपूर्ती आणि त्यानंतर निर्माण झालेला न्यायालयीन वाद यामुळे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया चर्चेत आली.


दरम्यान, शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराला समविचारी आघाडीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाच्या अध्यादेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चारही संचालकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

मात्र, न्यायालयाने या चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत घेण्याचे, संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे तसेच मतदानाशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर करता येणार असला तरी संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे अध्यक्ष निवडीचे राजकीय गणित चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आजच्या सभेत कोणते संचालक उपस्थित राहतात, कोणाच्या बाजूने मतदान होते आणि अखेर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे दूध उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


गोकुळमधील या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post